- भास्कर लांडेपालम (जि.परभणी) : बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन भांडणात झाल्याने तिघांनी मिळून एकाला जिवांशी संपविले. ही घटना पालम तालुक्यातील वानवाडी येथे १० एप्रिलला रात्री ९.३० वाजता घडली. दरम्यान, तिन्ही आरोपींना अटक केली असून पालम ठाण्यात त्यांच्यविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालम तालुक्यातील वानवाडी येथील राजेभाऊ शिवाजी वाडीकर (वय ४०) याने युवतीची छेड काढली. हे कळताच युवतीचे भाऊ सोमनाथ राजेभाऊ वाडीकर, बबलू ऊर्फ रामेश्वर राजेभाऊ वाडीकर वाडीकर, नागेश संजय वाडीकर यांनी राजेभाऊ वाडीकर यांना विचारपूस सुरू केली. दरम्यान, त्यांच्या वाद सुरू झाल्याने त्याचे पर्यावसन भांडणात झाले. त्यावरून तिघांनी राजेभाऊ वाडीकर यांना धारदार शस्त्राने मारहाण सुरू केली. त्यांनी राजेभाऊ यांच्या डोक्यात, डोळ्याच्या भुवईवर आणि गुप्तांगावर वार करून गंभीर जखमी केले. त्यातच राजेभाऊ यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पूर्णा येथील उपविभागीय अधिकारी ब्रह्मदेव गावडे, पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, सपोनि दिनेश सूर्यवंशी, फौजदार सुप्रिया केंद्रे, जमादार, एस.पी.कोलमवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तद्नंतर पहाटे मयताची आई शशिकलाबाई राजेभाऊ वाडीकर यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी सोमनाथ वाडीकर, बबलू वाडीकर, नागेश वाडीकर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि दिनेश सूर्यवंशी तपास करीत आहेत.
आरोपीस अटकमंगळवारी पहाटे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीच्या शोधात पालम पोलिस ठाण्याचे पथक रवाना करण्यात आले. पथकाला डीवायएसपी ब्रह्मदेव गावडे व पोनि प्रदीप काकडे यांनी मार्गदर्शन केले. गावडे यांनी पालम पोलिस ठाण्यातून आरोपीबद्दल पथकाच्या संपर्कात होते. लागलीच सपोनि मारोती कारवार, जमादार सुग्रीव केंद्रे, पुंजाजी साळवे यांनी आरोपींना वानवाडीच्या शिवारातून अटक केली.