पाथरी - तालुक्यामध्ये मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. यातच पात्री मंडळात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार उडाला. मंडळात एकाच दिवशी तब्बल ३१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे ओढ्यानाल्यांना प्रचंड पूर आला आहे.
दरम्यान, तालुक्यातील बोरगव्हान येथील एका शेतकरी भगवान नारायणराव खुडे यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. गट क्र १७३ मध्ये खुडे यांची शेती असून मुसळधार पावसाचे पाणी थेट त्यांच्या आखाड्यात शिरले. यामुळे तब्बल ४०० कोंबड्याचा मृत्यू झाला. तर ९ शेळ्याही पाण्यात वाहून गेल्याची माहिती आहे. यासोबतच ४० तुषार पाईप, मोटार, स्टार्टर, ३०० फूट वायर, चार्जिंग फवारा असे शेतीचे सामान देखील वाहून गेले. तसेच शेतातील पीक देखील अतिवृष्टीने नष्ट झाले.