परभणी : शहरातील वसमत राष्ट्रीय महामार्गावर एमआयडीसी कॉर्नर परिसरात धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. सुदैवाने, या वाहनातील व्यक्ती त्वरित बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या बर्निंग कारच्या थरारामुळे रस्त्यावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. आगीत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनास्थळी त्वरित पोलीस आणि अग्निशामक यंत्रणेने धाव घेऊन मदत कार्य केले.
परभणी शहरातील वसमत राष्ट्रीय महामार्गावर झिरो फाटा येथून परभणीकडे आलेली (एमएच १५ इएक्स ८१०६) या क्रमांकाची कार चंद्रपूर येथून नाशिककडे जात होती. या वाहनामध्ये सहा जण होते. वसमत राष्ट्रीय महामार्गावर औद्योगिक वसाहत परिसर गेट क्रमांक एक समोर कार आल्यानंतर या वाहनामधून धूर निघत होता. बघता बघता वाहनाने पेट घेतला. वेळीच वाहनातील व्यक्ती बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सदरील माहिती अग्निशमन विभाग आणि पोलिस यंत्रणेला देण्यात आली. खानापूर फाटा येथे कार्यरत असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी पी.आर.देशमुख हे घटनास्थळी त्वरित धावले. तसेच पोलीस उपनिरीक्षक मकसूद पठाण हे सूध्दा मदतीसाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी आले होते. अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. यामध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणी कोणताही गुन्हा दूपार पर्यंत नोंद झाला नव्हता.