परभणी : शहरातील वसमत महामार्गावर शिवाजी नगर भागात मुख्य चौकात सर्वात जूने असलेले एक झाड वादळी वारा नसताना अचानक जमिनीतून मुळासकट उन्मळून पडले. अचानक हे झाड महामार्गावर आडवे झाले. वाहनांची ये-जा सुरु असताना काही समजण्याच्या आत एका ऑटोवर आणि दोन दुचाकी यांच्यावर झाड आडवे झाले. यात वाहनांचा चक्काचूर झाला. ही घटना आज सकळी ११.१८ वाजेच्या सुमारास परिसरातील दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
परभणीतील वसमत रोड हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. शिवाजीनगर परिसरातील भगवती चौकातील हॉस्पिटलसमोर मोठे झाड रस्त्याच्या मधोमध आडवे पडले. सकाळी वर्दळीच्या वेळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान हा प्रकार घडला. दोन दुचाकी आणि एक प्रवासी ऑटोवर हे झाड पडल्याचे दिसून आले. घटनेनंतर तत्काळ शहर वाहतूक शाखेचे पथक आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले.
दुपारी एक वाजेपर्यंत सदर ठिकाणावरून झाड बाजूला काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. परिणामी, या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली तसेच वसमत रोड, वसंतराव नाईक पुतळा येथून शिवाजीनगर भागातून वाहतूक प्रशासकीय इमारत मार्गे वळविण्यात आली. दरम्यान, मनपाने पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजना अद्याप न केल्याने झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार होत आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.