पालम : पीकअप चालकाच्या प्रसंगावधानामुळे टायर निखळलेल्या बसमधील ६२ प्रवाशांचा जीव वाचला. त्यांच्यासाठी पीकअप चालक भागवत मुंडे ( रा. परळी, जि. बीड) देवदूत ठरले. ही घटना गंगाखेड-पालम राष्ट्रीय महामार्गावरील केरवाडी शिवरात बुधवारी दुपारी १ वाजता घडली.
गंगाखेड आगाराची एमएच- २२ बीएल- १७९३ क्रमांकाची बस गंगाखेडहून पालमकडे ६२ प्रवाशी घेऊन निघाली. ती केरवाडी शिवारात आली असता तिचे पाठीमागील एक चाक निखळले. तेंव्हा सदर बस भरधाव वेगाने होती. त्यामुळे निखळलेले चाक जवळपास १०० फूट अंतरावरील नालीत जाऊन पडले. तेंव्हा सदर बस एका टायरवर धाऊ लागली. ते टायर देखील पलिकडच्या बाजूला गेले होते. हे दृश्य समोरून येणाऱ्या पीकअप चालक भागवत मुंडे यांनी पाहिले. लागलीच त्यांनी बस थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ओरडून बस चालकास हातवारे केले.
ते बस चालक माणिक विठलराव टोने यांनी पहिले. सुरुवातीला त्यांनी डाव्या बाजूचे चाक पहिले, ते व्यवस्थित होते. त्यानंतर त्यांनी डाव्या बाजूला पहिले, तेंव्हा त्यांच्या लक्षात आले. तातडीने त्यांनी बसला ब्रेक लावला. त्यावेळी काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचे प्रवाशांना लक्षात आले. ते खाली उतरल्यावर हा सगळा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. तेव्हा त्यांनी ईश्वराचे आभार मानले. कारण बसचे टायर निघून जाण्याऐवजी पलीकडच्या दिशेने गेल्यामुळे ब्रेक लावेपर्यंत अपघात झाला नव्हता.
वेळेवर बस थांबली पालमहुन गंगाखेडकडे जात असताना माझ्यासमोरच बसचे टायर निखळले. ते बसच्या वेगामुळे लांब अंतरावर जाऊन पडल्याचे मी पाहिले. त्यानंतर लागलीच मी बस चालकास हातवारे ओरडून सांगितले. परंतू बस चालकाच्या लक्षात आले नाही, असे मला पहिल्यांदा वाटले. मी माझी पीकअप थांबविली. शिवाय, समोरून आलेली दुचाकीला थांबून बसचा पाठलाग करण्याचा बेत केला होता. परंतु, माझा इशारा बस चालकास समजल्याने त्यांनी वेळेवर बस थांबविली होती.- भगवत मुंडे, पीकअप परळी वैजनाथ, जि. बीड.