परभणी: कारेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, या प्रमुख मागणीसाठी एका युवकाने मंगळवारी दुपारी १ वाजता जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन सुरु केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी घटनास्थळी जोपर्यंत दाखल होत नाहीत, तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा या युवकांनी घेतल्याने मोठी खळबळ उडाली.
परभणी शहरातील देशमुख हॉटेल ते कारेगाव रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या कामासाठी वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन ही करण्यात आले. मात्र प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कानाडोळा केला. परिणामी, विद्यार्थी, नागरिक व महिलांना ये- जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर राहुल खटिंग यांनी या रस्त्याच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन दिले. मात्र तरीही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. या रस्ता कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राहुल खटिंग यांनी अचानक मंगळवारी दुपारी ममता कॉलनी परिसरातील जलकुभावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले.
त्यानंतर नवा मोंढा पोलीस, महानगरपालिकेचे अभियंता मिर्झा तनवीर बेग, अभियंता बालाजी सोनुले यांनी हे आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिल्याशिवाय जलकुभावरून उतरणार नाही, असा पवित्रा राहुल खटिंग यांनी घेतला. त्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जलकुंभ परिसरात आले. त्यानंतर लवकरच या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन यावेळी खटिंग यांना देण्यात आले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.