परभणी येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी गुरुवारी प्रा. कवाडे परभणी दौऱ्यावर आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत जाऊन सरकार स्थापनेसाठीचा सल्ला पीपल्स रिपब्लिकन पक्षाने दोन्ही काँग्रेसला दिला. त्यानुसार महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. परंतु, या सरकारने आमच्या पक्षाला सत्तेत सहभागी करून घेतले नाही. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडी सरकारने सत्तेतील वाटा दिला नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती प्रा. कवाडे यांनी दिली. परभणी जिल्हा प्रशासनाकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या गणपत भिसे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे हे संविधानिक नव्हे तर तालिबानी प्रवृत्तीचे जिल्ह्यातील प्रशासन आहे. भिसे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी परभणीत आंदोलन करणार असल्याचे कवाडे म्हणाले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, प्रदेशाध्यक्ष चरणदास इंगोले, मराठवाडा अध्यक्ष गणेशराव पडघन, राज्य संघटक गौतम मुंढे, जिल्हाध्यक्ष अरुण गायकवाड, संजय गायकवाड, युवाध्यक्ष दत्ता नंद, संजय शिंदे, शाम खिल्लारे, बाळू पैठणे, अजित घोबाळे, दयानंद, सय्यद आमिन, लक्ष्मीबाई जोगदंड, अशोक मस्के, राकेश साळवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
...तर निवडणुका स्वबळावर लढणार-कवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:19 AM