लोकमत न्यूज नेटवर्क, परभणी : मृत सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी मोर्चा काढला. सोमनाथच्या मृत्यूला दीड महिना उलटला तरी अद्यापही सरकारने पोलिसांवर गुन्हा नोंदवला नाही. प्रशासन चौकशी सुरू आहे, असे सांगत आहे. न्याय मिळाला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीव देणार, तेव्हाच प्रशासन माझी दखल घेईल, अशी उद्विग्नता मृत सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई यांनी यावेळी व्यक्त केली.
जनआक्रोश मोर्चामध्ये विजयाबाई सूर्यवंशी यांच्यासह कुटुंबीयसुद्धा सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आले असता विजयाबाई सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन न्याय मागणीसाठी दाद मागितली. न्याय घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. त्यानंतर मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधला.