कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष शाळा भरणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण द्यावे लागत आहे. इंग्रजी शाळांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी असते. त्यामुळे त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध असते; परंतु जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती बिकट आहे. ग्रामीण भागात असलेल्या या बहुतांश शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना स्वत:च्या मोबाइलचा डेटा वापरून ऑनलाइन शिक्षण द्यावे लागत आहे. प्रशासकीय पातळीवरील उदासीनता यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
ग्रामपंचायतींच्या पुढाकाराची गरज
ग्रामीण विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीतून ग्रा.पं. कार्यालयात इंटरनेट जोडणी घेऊन सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ती वापरण्यास देता येऊ शकते. त्यादृष्टिकोनातून ग्रा.पं.नी सकारात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले तर विद्यार्थी व शिक्षकांचा इंटरनेचा प्रश्न सुटू शकतो. शिवाय काही दानशूर व्यक्ती व संस्थांनीही याबाबत पुढाकार घेतल्यास विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.
आमची शाळा दीड वर्षापासून बंद आहे. आमच्या शाळेत इंटरनेट नसल्याने व वडिलांकडे इंटरनेट असलेला मोबाइल नसल्याने शिक्षण घेता येत नाही. सोबतच्या मित्राच्या घरी जाऊन कधीकधी मोबाइलवरून सरांचे शिकविणे ऐकतो; पण समजत नाही.
- संजय काळे, विद्यार्थी
पप्पांचा ऑनलाइन शाळेसाठी मोबाइल वापरतो; परंतु अनेकदा इंटरनेट चालतच नाही. त्यामुळे सरांची शिकवणी नियमित ऐकता येत नाही. खूप वाईट वाटते. आता प्रत्यक्ष शाळा सुरू कधी होते, याची आतुरतेने वाट पाहत आहे. - अमोल शिंदे, विद्यार्थी
आम्ही आमच्या मोबाइलवरून ऑनलाइन शिक्षण देत आहोत; पण इंटरनेटची गती कमी राहत असल्याने विद्यार्थी व पालकांची ओरड होत असते. त्यामुळे शासनाने महानेटच्या माध्यमातून शाळेला इंटरनेट कनेक्शन दिले, तर सोयीचे होईल. - शरद ठाकर, शिक्षक, केमापूर
कोविडमुळे शाळा बंद आहेत. शाळेत नियमानुसार ५० टक्के उपस्थितीत राहतात. मी स्वतःच्या मोबाइलवरून ऑनलाइन शिक्षण देत आहे. तरीही शाळेत इंटरनेट कनेक्शन व साधनांची उपलब्धता नसल्याने शिक्षणात व्यत्यय येत आहे. - भुजंग थोरे, शिक्षक, सेलू
जिल्हा परिषदेचे शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यास गटाच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत. ५ विद्यार्थ्यांचा एक गट असे जिल्ह्यात एकूण १७०० पेक्षा अधिक गट स्थापन करण्यात आले आहेत. याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. -डॉ. सुचेता पाटेकर, शिक्षणाधिकारी