जिल्हा बँकेच्या अनुषंगाने घेतलेली भूमिका मांडण्यासाठी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, परभणी व हिंगोली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या बँकेत १२५० कोटी रुपयांचे डिपॉझिट आहे. २०० कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे. ही शेतकऱ्यांची बँक असल्याने त्यांना वेळेवर पतपुरवठा झाला पाहिजे. १९८९ ते २००२ पर्यंत बँक आ. सुरेश वरपूडकर यांच्या ताब्यात होती. तर २००२ ते २०२० पर्यंत माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या ताब्यात होती. त्यामुळे बँकेत आजपर्यंत घराणेशाही जोपासण्याचा प्रयत्न झाला. सहकार क्षेत्रात पक्षाचा संबंध येत नाही. त्यामुळे आपण जय तुळजा भवानी पॅनलकडे जाण्याची भूमिका घेतली. तसेच परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यात धनगर व माळी समाजाचे मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तराव मायंदळे यांच्या माध्यमातून धनगर समाजाला प्रतिनिधीत्व देण्याची मागणी आ. वरपूडकर यांच्याकडे केली होती; परंतु मायंदळे यांना डावलण्यात आले. त्यामुळेच जय तुळजा भवानी शेतकरी विकास पॅनलकडे गेल्याचे दुर्राणी म्हणाले.
सहकार क्षेत्रात पक्षाचा संबंध येत नाही : दुर्राणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:17 AM