देवगावफाटा (परभणी ) : पावसाळ्यात करपरा नदीला पूर आला की नरसापुरचा दहादहा दिवस संपर्क तुटतो. १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथून एका रुग्णवाहिकेतून आणलेला मृतदेह पूल नसल्याने थेट गावात नेता आला नाही. शेवटी बैलगाडीतून मृतदेह नदीतून न्यावा लागला. अनेकदा तर लेकरा-बाळांना डोक्यावर घेऊन कंबरे इतक्या पाण्यातून नदीपार करावी लागते. येथील अनेक पिढ्यांनी नेते व अधिकाऱ्यांच्या हातापाया पडल्यानंतरही आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही अशा व्यथा ग्रामस्थानी मांडल्या.
सेलू तालुक्यातील ५६० लोकवस्तीचे नरसापुर हे गाव आहे. एका बाजुला तलाव तर तिन्ही बाजुने करपरा नदीचा वेढा आहे. नरसापुर ते बोरकीनी रस्त्यावर ही नदी आडवी येते. येथील भिमराव उकंडी शेळके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथून रुग्णवाहिकेतून गावाकडे आणण्यात आला. मात्र, करपरा नदीला कंबरेइतके पाणी असल्याने रुग्णवाहिका पुढे गेली नाही. शेवटी मृतदेह बैलगाडीद्वारे नदीपार करून गावात आणण्यात आला.
पूल नसल्याने पूर किंवा पाणी वाढले की येणे - जाणे बंद होते. कधीकधी तर १५ दिवस अनेक गावांचा संपर्क तुटतो. ग्रामस्थांनी अनेकदा पूल उभारणीची मागणी केली. परंतु, आश्वासन व सर्वेक्षण यापुढे काहीच झाले नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधी पूल उभारणीसाठी प्राधान्याने प्रयत्न करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांचे हाल आणि अतोनात नुकसान पाऊस आला की,गावचा संपर्क तुटतो. पावसाळ्यात दोन दोन महिने सायकल, दुचाकीदेखील नेता येत नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक करता येत नाही. गावातील दूध उत्पादकांना दुध डोक्यावर न्यावे लागते. ७५ वर्षापासूनचा हा प्रश्न कधी सुटणार.- प्रसाद जावळे, ग्रामस्थ, नरसापुर
या पूर्वीच्या घटना : - यापूर्वी ११ आँक्टोबर २०२० रोजी येथील युवकाला सर्पदंश झाल्याने करपरा नदिच्या पुरातून नेतांना १४ यूवकांना आर्धातास कसरत करावी लागली त्यानंतर जालना येथे उपचार घेऊन हा युवक बरा झाला होता.- २२ जुलै २०२१ रोजी ही बोरकीनी येथील शेतकरी अर्जून मुसळे हे या नदिच्या पुरात वाहुन जात असतांना ४ युवकांनी दोरखंड च्या सहाय्याने त्यांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले होते.