परभणी - आदिलशाही, अकबर, टिपू यांची राज्यं होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य कधी कुणी म्हटलं होतं का? त्यांच्या राज्यात रयतेचं राज्य म्हटलं गेलं होतं. यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये 'शिवरायांचा भगवा' आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार आहेत अशी घोषणा अजित पवार यांनी पाथरी येथील जाहीर सभेत केली.
या सभेत बोलताना अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली. अजित पवार म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने पीक विमा मिळत नाहीय. देवेंद्र फडणवीस कधी देणार हमीभाव? कशाला शेतकर्यांना फसवताय असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला.
मराठवाडयाला पाच वर्षांत शेतीसाठी या सरकारकडून काय मिळाले? लोकसभेत दगाफटका झाला पाथरीने चांगलं काम केलं त्याबद्दल जाहीर आभार परंतु आतातरी ताक फुंकुन प्या.सावध रहा. उद्याची पहाट तुमची आहे. योग्य सल्ला, दिशा देवू यातून समाज पुढे गेला पाहिजे. आमचं सरकार निवडून आणा चार महिन्यात तुमचा सातबारा कोरा करून दाखवतो नाहीतर पवारांची अवलाद सांगणार नाही असं आवाहन अजित पवार यांनी जनतेला केले.
दरम्यान घटनेने आम्हाला अधिकार दिलाय आणि तुम्ही आमची मुस्कटदाबी का करताय? पाच वर्षांत 'त्या' बॅंकेत कमिटीच्या मिटींगला गेलो नाही. माझा वैयक्तिक संबंध नाही. निवडणूक सुरु झाली की आलेच आदेश, नोटीस असा टोला लगावतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून त्यांची ९ तास चौकशी करण्यात आली. कायदा सर्वांना समान हवा परंतु ज्या पद्धतीने राजकारण सुरु आहे हे योग्य नाही अशी टीका अजित पवारांनी राज्य सरकारवर केली.
तसेच १८ रुपये पीक विमाचे पैसे शेतकऱ्याला दिले आहेत पीक विमा कंपन्या गडगंज झाल्या आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत बटण दाबताना शंभरवेळा विचार करा व आघाडीची सत्ता आणा असे आवाहन अजित पवार यांनी केले.