गंगाखेड (जि. परभणी) : गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेली ऊसतोड कामगारांची दोन मुले पाण्यात बुडाली. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देउळगाव दुधाटे (ता. पालम) येथे घडली. २४ तासानंतरही शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत या मुलांचा शोध लागला नव्हता.
गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पालम तालुक्यातील देऊळगाव दुधाटे शिवारात पाथरी तालुक्यातील ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी आले आहेत. या कामगारांची तीन मुले ८ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उसाच्या फडापासून जवळच असलेल्या गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. तिघांपैकी बालाजी कुंडलिक राठोड (२२) व युवराज मदन राठोड (१२, दोघे रा. लोणी (धर्मे) तांडा, ता. पाथरी) हे दोघे नदीकाठावर असलेल्या थर्माकॉलच्या होडीवर बसून नदी पात्रात उतरले. मात्र, होडीचा तोल गेल्याने दोघेही नदी पात्रात पडले. काठावर असलेल्या मुलाने ही माहिती फडावर जाऊन पालकांना दिली.
दोन्ही मुलांच्या पालकांसह ऊसतोड कामगारांनी नदीपात्राकडे धाव घेऊन पाण्यात बुडालेल्या दोन्ही मुलांचा शोध सुरू केला. मात्र, त्या दोघांचाही २४ तासानंतरही शोध लागला नाही. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, जमादार रतन सावंत, कर्मचारी दत्तराव पडोळे, कृष्णा तंबूड आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.