परभणी : महायुतीसमोर विरोधकांचा टिकाव लागत नसल्याने ते दिशाहीन वक्तव्य करीत आहेत. त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत, सकाळी नऊ वाजेपासून भोंगे सुरू ठेवून आमच्यावर टीका करीत आहेत. अशाने परिवर्तन होणार नाही, त्यासाठी विकासाबाबत प्रश्न मांडत अपेक्षित सूचना कराव्यात, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विराेधकांवर केली.
परभणीतील कृषी विद्यापीठात रविवारी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. मराठवाड्यातील दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी वॉटरग्रीड हा प्रकल्प हाती घेतला होता. परंतु, मविआ सरकारकडून अपेक्षित गती मिळाली नाही. परंतु, आता यासाठी २० हजार कोटींसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असून यात प्रामुख्याने गोदावरी खोऱ्यातून पाणी आणत मराठवाड्यातील महत्त्वाचे प्रकल्प एकमेकांना जोडणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
‘ऑनलाइन’वरून त्यांना ‘लाइन’वरच आणले - मविआ सरकारच्या काळात कायम घरात बसून ऑनलाइनवर राज्याच्या कारभार पाहणाऱ्यांना आम्ही लाइनवर आणण्याचे काम केले. त्यांना असा झटका आमच्या माध्यमातून मिळाला की, ते थेट लाइनवरच आल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली. - सरकार पडणार मुख्यमंत्री बदलणार, असे बोलले जात असले तरी तशी शक्यता आता तर नाहीच. कारण अजित पवारांचा भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळे महायुती अधिक सक्षम झाल्याने त्याचा परिणाम आगामी काळातसुद्धा दिसून येईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक राज्यात अफवा पसरवण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. परंतु, देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरे खंबीर नेतृत्व नसल्याचे जगाने मान्य केले आहे. त्यामुळे या विकासाच्या प्रक्रियेत इतरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.