परभणी : सेलू शहरातील रवळगाव रस्त्यावर शेत आखाड्यावर असलेल्या वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून जबरी चोरी केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने एका आरोपीस जालना जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. संबंधित आरोपीकडून सोन्याचे मनी व डोरले असा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे.
रामदास प्रभू चव्हाण यांनी सेलू ठाण्यात या जबरी चोरी प्रकरणात बुधवारी फिर्याद दिली. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रवळगाव रस्त्यावर रेल्वे रुळाच्या बाजूला शेतातील आखाड्यावर सदरील जबरी चोरीचा प्रकार घडला. चार अनोळखी आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना काठी व चाकुने मारहाण करून मुद्देमाल चोरून नेला होता तसेच फिर्यादीच्या पत्नीने विरोध केला असता त्यांच्या तळहातावर चाकूने मारहाण करून जखमी केले होते. या वयोवृद्ध दांपत्यास झालेल्या मारहाण प्रकरणाची दखल व चोरीच्या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक रागसुधा. आर. यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला आरोपी शोधण्याचे आदेश दिले.
त्यावरून या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे किशन सिताराम काळे (२५, रा.बाजार गल्ली, साठे नगर, आष्टी, ता. परतुर) या सापळा रचून शिताफीने आष्टी येथून ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी सेलू पोलीस ठाण्यात हजर केले. या गुन्ह्यातील एकूण चोरी गेलेला सोळा हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, पोलीस कर्मचारी विलास सातपुते, सिद्धेश्वर चाटे, मधुकर ढवळे, राम पौळ, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांनी केली.