लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : व्यापाऱ्यावर पाळत ठेवून पाच चोरट्यांनी लुटण्याचा कट आखला. त्यानुसार २ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरातील वकील कॉलनीतील गौतमी सुपर शॉपीच्या मालकाची दुचाकी अडवून मारहाण करीत ३ लाख ६१ हजार २६० रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या पैशातून पुण्यात जावून मौजमस्ती करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली.
गंगाखेड शहराच्या अदालत रोडलगत वकील कॉलनीत अनेक व्यवसाय मागील काही दिवसांपासून सुरू झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची गर्दी दर दिवशी वाढत जात आहे. दिवस-रात्र या ठिकाणी नागरिकांचा राबता असल्याने या राबत्याचा फायदा घेण्याचे चोरट्यांनी ठरविले. त्यानुसार वकील कॉलनीतील गौतमी सुपर शॉपीचे मालक कुणाल अनिल यानपल्लेवार यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरू केले. २ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ९ वाजता कुणाल यानपल्लेवार यांनी नियमितपणे दिवसभर व्यवसाय करून आलेले पैसे बॅगेत भरले. त्यानंतर आपल्या दुकानाच्या बाहेर उभ्या असलेल्या दुचाकीला ही बॅग लटकवली. त्यानंतर यानपल्लेवार यांच्यावर पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी त्यांना दुकानापासून १०० मीटर अंतरावर अडविले.
एका चोरट्याने त्यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे खाली पडलेल्या यानपल्लेवार यांच्या दुचाकीला लटकवलेली ३ लाख ६१ हजार २६० रुपयांची बॅग चोरट्यांनी लंपास केली. त्यानंतर त्यांनी घडलेली घटना वडील व भावास सांगितली. त्यानंतर तिघांनी मिळून गंगाखेड पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घटना सांगून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी दोन पथके तयार केली. गंगाखेड पोलीस व स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने चोरट्यांचे लोकेशन काढून पुणे गाठले. या ठिकाणी चोरलेल्या पैशातून पुण्यात मौजमस्ती करणाऱ्या अर्जुन नागनाथ बडवणे, साहील सुंदरराव उर्फ राजेश जाधव, किशोर उर्फ मुन्ना विठ्ठलराव भोसले (सर्व रा. खडकपुरा गल्ली, गंगाखेड) यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. या चोरट्यांकडून स्कुटी, १ लाख ३४ हजार रोख रक्कम, मोबाइल, एक गावठी बनावटीचे पिस्तूल व फिर्यादीची रिकामी काळी बॅग, दोन बँकेत पैसे भरलेल्या पावत्या आदी जप्त करून ५ पैकी ३ चोरट्यांना गजाआड केले. सध्या हे चोरटे न्यायालयीन कोठडीत आहेत.
चोरी प्रकरणातील चाेरटा उस्मानाबाद पोलिसांच्या तावडीतून पळाला
n गंगाखेड येथील व्यापाऱ्याला लुटल्यानंतर या चोरट्यांनी गंगाखेड पाेलिसांना हुलकावणी देत लातूर जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यात पोहचले.
n तुळजापूर तालुक्यातील ढेबळी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका ढाब्यावर मद्यप्राशन करून यथेच्छ जेवण केले. त्यानंतर गोंधळ घालून पिस्तुलातून गोळी झाडण्यापर्यंत या चोरट्यांनी मजल गेली.