- रेवणअप्पा साळेगावकरसेलू (परभणी) : दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. तर केवळ २४.१० टक्के पाणीपातळीतील तहानलेल्या निम्न दुधना प्रकल्पात सोमवारी सकाळी १० वा.पर्यंत ७०.८५ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता नदिपात्रात केंव्हाही पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्याखाली नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्याबाबत जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु. भी. कोरके यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन कळविले आहे.
३१ ऑगस्ट रोजी शनीवारी निम्न दुधना प्रकल्पात २४.१० टक्के जिवंत पाणीसाठा होता. शनीवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. रवीवारी पावसाने चांगलाच जोर धरला.रवीवारी सायंकाळपर्यंत पाणीपातळी २६.४४ टक्यावर गेली. सोमवारी सकाळी ६ वाजता जीवंत जलसाठा ६१.९३ टक्यावर गेला. तो सकाळी ८ वा ६६.५१ टक्केवरून १० वाजता ७०.८५ टक्के असा आहे. दोन दिवसात जवळपास ४६ टक्के पाणी वाढले. तर दुसरीकडं पाणलोट क्षेत्रात काही ठिकाणी भुसंपादना अभावी मावेजा मिळाला नसल्याने यादरम्यान शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन या धरणात पाणी साठवण क्षमता १०० वरुन ७५ टक्यावर आणलेली आहे. त्यामुळे धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ ४ टक्के पाणीसाठा लागणार आहे. पाऊस सुरूच राहीला तर हे धरण ७५ टक्के भरेल. या पार्श्वभूमीवर सांडवा किंवा नदिपात्रात केंव्हाही पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. पुर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रकल्पाच्याखाली नदीकाठच्या गावांतील नागरीकांनी नदीपात्रात जाऊ नये, आपापल्या जनावरांची काळजी घेणे वित्त, जीवितहानी होऊ नये, याबाबत सतर्क राहण्याचा इशारा देण्याबाबत जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु.भी. कोरके यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना सोमवारी पहाटे पत्र देऊन कळवीले आहे.
अशी वाढत गेली पाणीपातळीनिम्न दुधना प्रकल्पात पाणीपातळी शनीवारी सकाळी २४.१० टक्के होती.ती संततधार पावसाने रवीवारी रात्री ८ वा.२६.४४ टक्के अशी झाली. सोमवारी पहाटे २ वा. हि टक्केवारी ४९.९४ पर्यंत गेली.त्यानंतर २ तासांनी म्हणजे ४ वा.५५.७६ टक्के झाली. तर सकाळी ६ वा.पाणीपातळी ६१.९३ टक्के तर सकाळी ८ वा.६६.५१ टक्के तर १० वा.७०.८५ म्हणजे २४२.२०० दलघमी असा पाणीसाठा झाला.गेल्यावर्षी २ सप्टेंबर २०२३ रोजी या धरणात जिवंत पाणीसाठा २६.०७ टक्के(६३.१४२ दलघमी )होता.या तुलनेत सद्यस्थितीत ७०.५१ टक्के म्हणजे २४२.२०० दलघमी वर असा समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.
वाहतूक व्यवस्था ठप्प.दोन दिवसापासून जोरावर पावसाने कसुरा नदीला पुर आल्याने परभणी व पाथरी हि वाहतूक ठप्प झाली तर राजवाडी,हातनूर या मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्याने वालूर कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. याशिवाय परतूर मार्ग ही बंद आहे.एकंदरीत रवीवार रात्री पासून वाहतूक ठप्प आहे.