येलदरी (परभणी ) : पावसाच्या अचूक नोंदी व्हाव्यात यासाठी लाखो रुपये खर्च करत शासकीय पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले. यावरून अतिवृष्टी व पावसाचा अचूक अंदाज घेण्यात येतो. तसेच या नोंदीवरून दुष्काळ व सुकाळ जाहीर करण्यात येतो. मात्र जिंतूर तालुक्यातील सांवगी म्हाळसा येथील शासकीय पर्जन्यमापक यंत्र येड्या बाभळीच्या काटेरी झुडपात गेल्याने पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाची योग्य नोंद होत नाही. त्यामुळे २०हून अधिक गावांतील शेतकरी शासनाच्या अतिवृष्टीच्या निकषात बसत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे.
जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथे २० ते २५ गावांसाठी एकच ऑनलाइन पर्जन्यमापक यंत्र असून, पाऊस मोजण्याची शासनाची यंत्रणा आहे. महावेध या पोर्टलवर येणाऱ्या आकडेवारीवरूनच जिल्ह्यातील पर्जन्यमापन निश्चित केले जाते. त्यामुळे गेल्या तीन- चार वर्षांपासून कृषी आणि महसूल दोन्ही विभागांकडून पर्जन्यमापनाचे काम केले जात नसून, मोजमापही ‘रामभरोसेच’ असल्याचे चित्र आहे. महसूल मंडळांचा पाऊस यापूर्वी पर्जन्यमापक यंत्रात पडलेल्या पावसाच्या पाण्यावरून निश्चित केला जात होता. महसूल अथवा कृषी विभागाचे कर्मचारी याची नोंद घेऊन वरिष्ठ कार्यालयात पाठवित होते. मात्र, मॅन्युअली आणि तांत्रिक पद्धती यातील आकडेवारीत मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याचे गतवर्षी निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे एका खासगी कंपनीकडून जिल्ह्याच्या महसूल मंडळाच्या ठिकाणी आधुनिक पर्जन्यमापक बसविले आहेत. त्याची आकडेवारी महावेध या पोर्टलवर जाते. तेथून ऑनलाइन पद्धतीने त्या-त्या तालुक्यात पाहायला मिळते.
सावंगी म्हाळसा हे एक मंडळ आहे. येथे एक ऑनलाइन पर्जन्यमापक यंत्र बसवलेले आहे. मात्र या यंत्रावरून आजूबाजूच्या २० ते २५ गावांत पडलेला पाऊस अंदाजे धरल्या जात आहे. त्यामुळे जेथे यंत्र बसवलेले आहे. त्या ठिकाणी कमी पाऊस झाला असल्यास इतर गावच्या ठिकाणी अतिवृष्टी झाली तरीदेखील त्या गावात कमी पाऊस झाल्याची नोंद सरकार दप्तरी होत असल्यामुळे शेतकरी विमा संरक्षण, शासनाची विविध अनुदान यापासून वंचित राहत आहेत. महसूल मंडळाची गावे ५ ते २० किलोमीटरवर आहेत. असे असतानाही महसूल गावनिहाय मोजमाप केले जात नाही. त्यामुळे शासनाचे पर्जन्यमापन हा प्रकार काहीसा अजब असल्याचे चित्र आहे. त्यातच जे शासकीय पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले. ते पूर्णपणे येड्या बाभळीच्या झुडपात अडकल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे.
२० गावांतील शेतकऱ्यांवर होतोय अन्यायजिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा मंडळांतर्गत पडणाऱ्या अतिवृष्टीची योग्य नोंद होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून, हे ऑनलाइन पर्जन्यमापक यंत्र पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. या परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून मुकावे लागत आहे. याकडे शासनाने तत्काळ लक्ष देऊन सावंगी म्हाळसा मंडळातील सर्व गावे अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करावीत, अशी मागणी सावंगी म्हाळसा, केहाळ, सावळी, हिवरखेडा, मुरूमखेडा, किन्ही, घडोळी, मानकेश्वर आदी गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.