- राजन मंगरुळकरपरभणी : कोरोना कालावधीत बदललेल्या जीवनशैलीचा आणि शारीरिक तसेच आर्थिक फटक्यांचा अनेकांवर दुष्परिणाम झाला आहे. हा दुष्परिणाम विविध वयोगटातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यात उदासिनता, चिंता आणि व्यसनाधिनतेच्या लक्षणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. त्यातूनच तब्बल २० हजार रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील मनोविकृती विभागात जाऊन बाह्यरुग्ण नोंदणी विभागात तपासणी करून घेतली. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे दिसून येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या केलेल्या आरोग्य सर्वेक्षण अहवालानुसार जवळपास ७.५ टक्के नागरिकांना मानसिक आजाराने ग्रासले असल्याची आकडेवारी आहे. मानसिक आजाराचे प्रमाण कोरोना महामारीनंतर सर्वत्र वाढले. कोरोना कालावधीत आपल्या घरातील सदस्य गमावणे तसेच लॉकडाऊन आणि इतर कारणांमुळे ताणतणाव, आर्थिक नुकसान, व्यवसायातील फटका या सर्व बाबींनी अनेकजण चिंताग्रस्त झाले. हीच स्थिती परभणी जिल्ह्यातही पाहायला मिळाली. जिल्हा रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागामध्ये रुग्णांची तपासणी संख्या वाढल्याचे यात दिसून आले.
तरुणांचे प्रमाण सर्वाधिकवयोगट १५ ते ३५ मध्ये ही समस्या अधिक जाणवत आहे. कोरोनानंतर आता अनेकांना उदासिनता, चिंता, व्यसनाधिनता यांनी ग्रासल्याने अनेकजण समुपदेशन, तपासणीसाठी येत आहेत. यातील ९० टक्के रुग्णांना समुपदेशन केले जाते, तर आवश्यक असलेल्या ५ ते १० टक्के रुग्णांवर औषधोपचार केले जात आहेत.
लहान मुलांमध्येही बदलशाळा, महाविद्यालये हे लाॅकडाऊनमध्ये बंद होते. त्यामुळे मुलांचा घराबाहेर संपर्क नव्हता. त्यातच मोबाईल पाहण्याचे प्रमाण वाढल्याने लहान मुलांमध्ये शारीरिक बदल झाले आहेत. त्यातून १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलेसुद्धा तपासणीसाठी येत असल्याचे दिसून येत आहे.
५० खाटांची सोयजिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथे मनोरुग्णांसाठी ५० खाटांची सोय आहे. कोविड महामारीत २०२०-२१मध्ये मनोरुग्णांची संख्या कमी होती. महामारीनंतर म्हणजे २०२२मध्ये मनोरुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्हा मानसिक आरोग्य अभियानांतर्गत मनोविकृतीशास्त्र विभाग जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय येथे महिन्यातून एकदा ठरविलेल्या दिवशी मनोरुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग चालविण्यात येतो. तेथे मनोरुग्णांना तज्ज्ञांमार्फत तपासून औषधेसुद्धा दिली जातात.
अशी आहे पाच वर्षांतील आकडेवारी२०१७ - २६४००२०१८ - २८७५९२०१९ - ३२५४९२०२० - २०५००२०२१ - २१५३१२०२२ - २०५५० (जानेवारी ते जून)
अनेकांना मानसिक आजाराची लक्षणे जाणवतात. त्यात काहींना झोप न लागणे, शारीरिक थकवा येणे, एकटेपणा वाटणे, चिडचिड वाढणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यात एकूण ३० ते ४० टक्के लोक तपासणीसाठी येतात. अनेकजण तपासणीला येत नाहीत. मात्र, अशी लक्षणे वाटल्यास रुग्णांनी तपासणी करून डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. गजानन श्रीरंग कपाटे, मनोविकारतज्ज्ञ, मनोविकृतीशास्त्र विभागप्रमुख, जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी