परभणी : किशोरवयीन मुलींनी आपला आहार चांगला ठेवला पाहिजे. संतुलित आहारामुळे शारीरिक समस्या तर दूर होतातच, शिवाय विचारही चांगले होतात, असे मत डॉ. वर्षा झंवर यांनी व्यक्त केले.
येथील बी. रघुनाथ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन व्याख्यानात त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विलास सोनवणे, महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. अर्शिया परवीन, प्रा. डॉ. अपर्णा देशपांडे यांची उपस्थिती होती.
प्रा. डॉ. वर्षा झंवर यांनी ‘किशोरवयीन मुले व मुली : आहार व आरोग्य’ या विषयावर व्याख्यान दिले. त्या म्हणाल्या, शिक्षण घेत असतानाच आरोग्याच्या तक्रारी वाढू नयेत. त्यासाठी दररोजच्या आहारात विविध जीवनसत्त्वे, प्रथिने, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा वापर केला पाहिजे. भारतात साधारणपणे दोन प्रकारची माणसे आढळतात.
एक म्हणजे अतिशय जाड माणसे कमी आहाराचे सेवन करून वजन कमी करतात आणि सडपातळ माणसे कायम आजारी असतात. त्यातील सुवर्णमध्य आपण साधला पाहिजे. कोविडच्या रुग्णांना दररोज विविध जीवनसत्त्वांच्या औषधी दिल्या जातात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे नियमित व्यायाम करा, असा सल्ला झंवर यांनी यावेळी दिला.