केंद्र शासनाच्या राष्ट्रीयीकृत अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत कल्याणकारी योजनेचा उपाय म्हणून शालेय विद्यार्थ्यांना २०२१ च्या उन्हाळी सुटीतील धान्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला. धान्याच्या प्रत्यक्ष खर्चा एवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे बँकेत खाते आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना मात्र अनुदानासाठी राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये बचत खाते काढावे लागणार आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग असून, विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी जीव धोक्यात घालून बँकेत जावे लागणार आहे. दीडशे रुपयांच्या अनुदानासाठी बँकेत खाते काढण्यासाठी १ हजार रुपये खर्च करावे लागणार असल्याने या किचकट प्रक्रियेविषयी पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किती जणांना लाभ मिळेल हा प्रश्नच आहे.
अनुदानापेक्षा खाते काढणे अवघड
शालेय पोषण आहाराचे अनुदान थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांना आता राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडावे लागणार आहे.
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी १५६ रुपये आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २३४ रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
३५ दिवसांच्या पोषण आहाराची ही रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. एवढ्या रकमेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत विद्यार्थ्यांचे खाते उघडणे परवडणारे नसल्याने अनेक पालकांनी याकडे पाठ फिरविली आहे.
कोरोनाच्या संसर्ग काळात गर्दी करण्याचे टाळले जात आहे. त्यातच शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना बँकेत जाऊन खाते काढण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे खाते काढण्यासाठी बँकेत चकरा माराव्या लागतील. प्रत्यक्षात अनुदानाची रक्कम पाहता पालकांत बँक खाते काढण्याविषयी नाराजीचा सूर आहे.
पालकांची डोकेदुखी वाढली
शालेय पोषण आहाराची रक्कम मिळविण्यासाठी बँकेत खाते उघडणे परवडणारे नाही. १५० रुपयांसाठी १ हजार रुपये खर्च करणे शक्य नसल्याने अनुदान मिळाले नाही तरी चालेल. परंतु, खाते उघडणे शक्य नाही.
- पालक, प्रतिक्रिया
कोरोनाच्या संसर्गामुळे घराबाहेर पडणे अवघड आहे. त्यात गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांचे खाते उघडणे शक्य नसल्याने शासनाने अनुदानाच्या रक्कम ऐवजी पोषण आहार द्यावा.
- पालक, प्रतिक्रिया