परभणी : आरोग्य विभागाच्या वतीने २५ व २६ सप्टेंबर रोजी घेतली जाणारी लेखी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने परीक्षेसाठी परभणीत आलेल्या विविध जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रासही सहन करावा लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
आरोग्य विभागाला सक्षम करण्यासाठी या विभागात पदभरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्यक असलेली पदभरती करण्याचे काम मे. न्यासा कम्युनिकेशन प्रा.लि या कंपनीला देण्यात आले; मात्र ही कंपनी उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यास व आसन व्यवस्था करण्यास असमर्थ ठरली. तसेच कंपनीच्या संचालकांनी परीक्षा घेण्याबाबत असमर्थता दर्शविली. त्यामुळे २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आली.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. बाहेर जिल्ह्यातूनही अनेक विद्यार्थी परभणीत दाखल झाले होते. तर परभणी जिल्ह्यातूनही अनेक विद्यार्थी औरंगाबाद, लातूर, नांदेड या सारख्या जिल्ह्यात परीक्षेसाठी आदल्या दिवशीच पोहोचले होते; मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
परभणीत १० हजार विद्यार्थी
आरोग्य विभागाच्या गट क पदासाठी २५ सप्टेंबर रोजी आणि गट ड साठी २६ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार होती. २५ सप्टेंबर रोजी ३० केंद्रांवर ८ हजार ४६३ विद्यार्थी तर २६ सप्टेंबर रोजी गट ड साठी ३६ केंद्रांवर १० हजार ९५८ विद्यार्थी परीक्षा देणार होते. रेल्वे आणि बसने अनेक विद्यार्थी आदल्या दिवशीच परभणीत दाखल झाले होते; मात्र परीक्षाच रद्द झाल्याने या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.
आरोग्य विभागाने केली होती तयारी
ज्या एजन्सीला परीक्षा घेण्याचे काम दिले होते, ती कमी पडत असल्याने आरोग्य विभागाला शेवटच्या टप्प्यात परीक्षा पार पाडण्यासाठी एजन्सीला सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी येथील आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ लिपिक अशा ५० अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी परीक्षेसाठी नियुक्ती केली होती.
जिल्ह्यातील एकूण केंद्र
३०
१०९५८
परीक्षार्थी