परभणी : निर्मनुष्य रस्त्यावर जाणाऱ्या एकट्या इसमांना अडवून त्यांच्या जवळील मोबाईल व पैसे यांची जबरी चोरी करणाऱ्या टोळीला परभणी पोलीस दलाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन आरोपींकडून एक लाख आठ हजारचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. तसेच या आरोपींकडून केलेले तीन जबरी चोरीचे गुन्हे निष्पन्न झाले आहेत.
गंगाखेड रोड मार्गावर ३१ ऑगस्टला विनोद कोकडवार यांचे वाहन थांबवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी काढून घेतल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी परभणी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. यातील आरोपी शोधासाठी स्थागुशाला आदेश देण्यात आले. त्यावरून सदर आरोपींचा शोध घेताना रविवारी पहाटे नाकाबंदी दरम्यान नानलपेठ हद्दीत पोलिसांना पाहून स्कुटी जागेवर टाकून तिघे जण पळून गेले होते. या स्कुटीमध्ये चाकू मिळून आला. त्यावरून पोलिसांनी तपास केला असता ही स्कुटी खानापूर फाटा येथून दीड महिन्यापूर्वी चोरीस गेल्याचे समजले. हे वाहन विवेक धनेश्वर साळवे, करण राजू पुंडगे आणि रेहान रहेमान कुरेशी हे वापरत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरून पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी परभणी ग्रामीण हद्दीतील तसेच नवा मोंढा हद्दीतील गुन्ह्यांबाबत कबुली दिली. या आरोपींकडून नगदी सात हजार, दोन मोबाईल, एक वाहन व गुन्ह्यात वापरलेला चाकू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, गोपीनाथ वाघमारे, पोलीस कर्मचारी तूपसुंदरे, जाधव, दिलावर खान, निलेश परसोडे, व्यंकट नरवाडे, पवन अवचार, गणेश कौटकर यांनी केली.