पाथरी : तालुक्यातील रामपुरी येथे शेत आखाड्यावर मारहाण करुन लूट करणाऱ्या तीन आरोपींना येथील न्यायालयाने दोन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी २ हजार रुपये दंड सुनावला आहे.
सर्जेराव मारोती लोकुले, त्यांची पत्न आणि अन्य एक नातेवाईक ३० सप्टेंबर २०१५ रोजी शेतातील घरासमोरील अंगणात झोपले होते. त्यावेळी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास तिघे जण हातात काठ्या घेऊन या ठिकाणी आले. चोरट्यांनी सर्जेवराव लोकुले आणि त्यांची पत्नी आणि नातेवाईकांना मारहाण करुन दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर घराची चावी घेऊन सोन्या-चांदीचे दागिणे व इतर साहित्य चोरून नेले. या प्रकरणी सर्जेराव लोकुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसांनी या प्रकरणात अंकुश साहेबराव शिंदे, कैलास शिवाजीराव झाकणे आणि प्रकाश लक्ष्मण झाकणे या तिघांना अटक केली होती. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक ए.एल. पांडे यांनी या प्रकरणाचा तपास करुन हे प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. २१ ऑक्टोबर रोजी पाथरी येथील प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकारी मयूर पवार यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्या. मयूर पवार यांनी आरोपी अंकुश शिंदे, कैलास झाकणे आणि प्रकाश झाकणे यांना दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी अभियोक्ता डी.एस. नाटकर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.