सेलू (जि. परभणी) : धावत्या बसमध्ये मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून युवकाला मारहाण केल्याप्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हा तर तीन जणांना अटक करण्यात आली. तर दुसरीकडे या घटनेबाबत मुलीने कोणत्याही प्रकारची तक्रार दिलेली नाही अशी माहिती पुढे आली आहे. सेलू ठाण्यात पोलिस नाईक अजय वीर स्वामी रासकटला यांनी याबाबत फिर्याद दिली.
सेलूहून पाथरीकडे धावणाऱ्या बस क्र. (एम.एच. २०, बी. एल. ३५०५) मध्ये कुंडीपाटीदरम्यान फारोखी म. शफी इमरान वसीमोद्दीन (रा. जैतापूरनगर, पाथरी) या युवकाने मुलीची छेड काढल्याचा कलह सुरू झाला. चालक सुनील राऊत यांनी बस सेलू बसस्थानकात परत आणताच छेड काढणाऱ्या युवकास छेड का काढली याच्या संशयावरून वाहक व्ही.बी. कुंभकर्ण, भारत राजेभाऊ शिंदे (रा. फुले नगर, सेलू), संतोष सोपानराव गायकवाड (रा. विद्यानगर) व इतर दहा ते पंधरा जणांनी मारहाण केली. याप्रकरणी सेलू ठाण्यात बुधवारी रात्री १८ जणांवर गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी सपोनि सुनील अंधारे तपास करीत आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोपने, पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.