परभणी : पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हा शाखा पथकाने आंतरजिल्हा जबरी चोरी व घरफोडी करणारी टोळी ताब्यात घेतली. यात परभणी, बीड, लातूर जिल्ह्यातील आठ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिस दलाला यश आले आहे.
परभणीच्या शांतिनिकेतन कॉलनीत २९ जूनला झालेल्या चोरीच्या घटनेत डॉ. भागवत कदम यांनी फिर्याद दिली होती. यात चोरट्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना चाकू व राॅडचा धाक दाखवून घरातील नगदी आणि सोन्या-चांदीचे दागिने, असा तीन लाख १४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांनी आरोपींचा शोध लावून गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पथकाने गुन्ह्यातील हडपसर (पुणे) भागातील अक्षय पाडुळे, कर्तारसिंग दुधानी (परळी) व इतर साथीदारांनी मिळून केल्याचे समजले. नमूद आरोपी हे या परिसरात वावरत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी हडपसर व परळीत जाऊन संशयित आरोपींचा दोन दिवस शोध घेतला.
यात अक्षय पोपटराव पाडुळे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता, त्याने सदरील गुन्हा जिब्रान खान आदम खान (रा. हडपसर, पुणे), कर्तारसिंग दुधानी व इतर तीन साथीदारांनी मिळून केल्याचे सांगितले. त्यावरून जिब्रान खान आदम खान यास सुद्धा ताब्यात घेतले. या आरोपींकडे इतर गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास केला असता, त्यांनी परभणी, बीड, लातूर जिल्ह्यातील एकूण आठ गुन्ह्यांची कबुली दिली. कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलिस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, नागनाथ तुकडे, मारुती चव्हाण, अजित बिरादार, गोपीनाथ वाघमारे यांच्यासह स्थागुशा कर्मचारी, सायबरचे बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांनी मदत केली.