परभणी तालुक्यातील पांढरी पोर जवळा येथे महावितरणचे एक पथक १६ ऑगस्ट रोजी तपासणीसाठी गेले असता मोतीराम गोपीनाथराव ढोले हे अनधिकृतपणे वीज जोडणी घेऊन वीज चोरी करताना आढळून आले. यावेळी केलेल्या पडताळणीत ढोले यांनी ७२ हजार १० रुपयांची वीज चोरी केल्याचे दिसून आले. याबाबत महावितरणचे सहायक अभियंता रवी नितनवरे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली. त्यावरून आरोपी मोतीराम गोपीनाथराव ढोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटनाही याच गावात निदर्शनास आली. या गावातील ज्ञानोबा माणिक पांचाळ हे काळ्या रंगाच्या वायरच्या साहाय्याने वीज चोरी करताना आढळून आले. यावेळी केलेल्या पडताळणीमध्ये त्यांनी ५ हजारांची वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना दंडासह १७ हजार ५५० रुपयांची रक्कम भरण्याचे सांगण्यात आले. यासाठी दिलेल्या कालावधीत पांचाळ यांनी रकमेचा भरणा केला नाही. त्यामुळे याबाबत सहायक अभियंता नितनवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नानलपेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना बोरवंड येथे घडली. या गावातील नारायण मारोतराव खुपसे यांनी वीज चोरी केल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या पथकास १४ ऑगस्ट रोजी निदर्शनास आले. यामध्ये खुपसे यांनी १५ हजारांची वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना दंडासह ३० हजार रुपयांचा भरणा करण्याचे सूचित करण्यात आले होते; परंतु खुपसे यांनी या रकमेचा भरणा केला नाही. त्यामुळे याबाबत सहायक अभियंता विकास दुधे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून आरोपी नारायण मारोतराव खुपसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीज चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:22 AM