पाथरी ( परभणी ) : गुंज येथील महात्माजी स्वामी संस्थेच्या गोशाळेत रविवारी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान अचानक आग लागून तीन गंजीतील ९० हजार कडबा पेंढ जाळून खाक झाली. संपूर्ण कडबा जळून खाक झाल्याने तब्बल ७५० गाईंच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाली आहे. आगीत जळालेल्या कडब्याची किंमत बाजार भावाप्रमाणे २२ लाख रुपये होती. आग विझविण्यासाठी पाथरी आणि मानवत येथील अग्निषमक दलाने सहा तास प्रयत्न केले.
पाथरी तालुक्यातील गुंज महात्माजी महाराज संस्थानची गोशाळा आहे. या गोशाळेत जवळपास ७५० गाई आहेत. गाईसाठी दान आलेला आणि चारा म्हणून खरेदी केलेल्या कडब्याच्या तीन गंजी गोशाळा परिसरात ३० ते ४० फूट अंतरावर लावण्यात आल्या होत्या. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास एका कडबा गंजीला अचानक आग लागली. काही क्षणातच तिन्ही कडबा गंजीने पेट घेतला. बघताबघता संपूर्ण पेंढ्या आगीच्या कवेत आल्या.
दरम्यान, पाथरी आणि मानवत येथील अग्निशमन दलाला घटनास्थळी तातडीने पाचारण करण्यात आले. पाथरी अग्निशमन दलाचे बळीराम गावडे ,खुररम खान ,शेख शेरू यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रत्यन केले. तब्बल ६ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तीन गंजीतील तब्बल ९० हजार कडबा पेंढी आगीत खाक झाल्या. यामुळे गोशाळेतील तब्बल ७५० गाईंच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.