परभणी : रस्ता अडविल्याच्या क्षुल्लक कारणातून झालेल्या वादानंतर एका डॉक्टरने बंदुकीतून झाडलेल्या गोळीने एक जण जखमी झाल्याची घटना २९ आॅक्टोबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील हॉटेल निरज समोरील रस्त्यावर घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. गोळीबार करणा-या डॉक्टरास पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- परभणी तालुक्यातील नांदखेडा येथील रामचंद्र रावसाहेब सावंत त्यांचे भाऊ विश्वंभर रावसाहेब सावंत आणि आणखी एक जण असे तिघे दुचाकीवरुन बसस्थानक परिसरातील निरज हॉटेलसमोरुन जात होते. त्यावेळी रस्त्यातच त्यांची गाडी बंद पडली. याच वेळी डॉ.प्रसाद मगर हे सुद्धा याच मार्गावरून चारचाकी गाडीतून येत होते. यावेळी सावंत आणि डॉ. मगर यांच्यात रस्ता अडल्यामुळे वाद झाला.
या वादातून डॉ. मगर यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी विश्वंभर रावसाहेब सावंत यांच्या डाव्या पायाला लागली. त्यानंतर जखमी विश्वंभर सावंत यांना उपचारासाठी तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर रेड्डी, नानलपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव गाडेकर, सहायक निरीक्षक सुनील गिरी यांनी घटनास्थळास भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉ.प्रसाद मगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त केली.
दरम्यान, या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. रामचंद्र रावसाहेब सावंत यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २९ आॅक्टोबर रोजी मी व माझा भाऊ दुचाकीने जात असताना वाटेत दुचाकी बंद पडली. त्यावेळी डॉ.प्रसाद मगर यांनी आपल्याला शिवीगाळ करीत गोळी झाडली. त्यात माझे भाऊ विश्वंभर सावंत जखमी झाले. दुस-या बाजूने डॉ.प्रसाद मगर यांनीही तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मी कारमधून जात असताना विश्वंभर सावंत, रामचंद्र सावंत अन्य एकाने रस्ता अडवून मला शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक निरीक्षक सुनील गिरी, जमादार बन्सी मुलगीर तपास करीत आहेत.