सेलू (परभणी ) : तालुक्यातील डासाळा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेत जात असलेल्या दोन बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात स्प्रे मारून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी पाच लाखांची रक्कम असलेली पिशवी घेऊन धुम ठोकली. ही घटना देऊळगाव गात जवळ आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलीस आणि बँक कर्मचारी चोरट्यांचा पाठलाग करत असून रूढी पाटीजवळ चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपये रस्त्यावर फेकले आहेत.
पोलिस सुञांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, डासाळा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे शाखाधिकारी केशव मांडे आणि रोखपाल बालासाहेब जाधव हे सेलू येथील मुख्य शाखेतून आज सकाळी डासाळा येथे बॅकेतील ग्राहकांना रक्कम वितरीत करण्यासाठी दुचाकीवरुन जात होते. देऊळगाव गात पाटीजवळ विना क्रमांकाच्या दुचाकीवरुन दोन चोरट्यांनी बॅक कर्मचारी यांच्या डोळ्यात स्प्रे मारून रक्कम असलेली पिशवी घेऊन मानोली मार्ग धुम ठोकली. पंरतु, दोन्ही कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून पोलीसांना माहिती देत चोरट्यांचा पाठलाग केला.
माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक साईनाथ अनमोड पोलीस कर्मचारी उमेश बारहाते, आप्पा वराडे, शेख गौस यांनी सुद्धा चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असल्याचे चोरट्यांच्या लक्षात येताच लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी रूढी पाटी ( ता. मानवत जि. परभणी) येथे पावणे दोन लाख रुपये रस्त्यावर फेकले. पोलिसांनी फेकलेली रक्कम ताब्यात घेऊन पाठलाग सुरूच ठेवला. पंरतु, दुचाकीवर असलेले चोरटे मानवत मार्गे परभणीकडे उर्वरित रक्कम घेऊन पसार झाले आहेत. दरम्यान, चोरट्यांचा तपास सुरुच आहे.