मानवत: सोनपेठ वाणीसंगम येथून ८० पोते सोयाबीन चोरून नेणाऱ्या पिकअपला पोलिसांनी ५० किमी पाठलाग करून ताब्यात घेतल्याची घटना आज पहाटे २. ३० वाजेच्या सुमारास घडली. यावेळी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. तर इतर दोघे अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.
तालुक्यातील रामपुरी शिवारात पो नि रमेश स्वामी यांच्या आदेशानुसार बिट जमादार मधुकर चट्टे, पोलीस नाईक सिद्धेश्वर पाळवदे, पोलीस शिपाई प्रल्हाद वाघ यांचं पथक पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, आज पहाटे २. ३० वाजेच्या सुमारास रामपुरी ते मुद्दगल रस्त्यावरून दोन दुचाकी आणि एक पीकअप (एम एच 22 ए ए 3303 ) वाहन येताना दिसले. पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असताना चालकाने पिकअप वेगाने पुढे नेले. तर दोन्ही दुचाकी वरील सहाजण देखील तेथून पसार झाले.
पोलिसांनी पिकअप परभणीकडे येत असल्याची माहिती तत्काळ नियंत्रण कक्षाला दिली. परभणी येथील नानलपेठ येथील पोलीस निरीक्षक चवरे आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील मोबाईल बीट, बीट मार्शल यांनी या पिकअपचा परभणीत पाठलाग सुरू केला. चालकाने पीकअप वसमत रस्त्याने असोला पाटी येथील जिजाऊ मंदिर समोर नेला. यावेळी पो नि चवरे यांनी पोलीस जीप समोर उभी करत रस्ता अडवला. दरम्यान, पीकअप थांबल्यानंतर त्यातील दोघे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.चालक मल्हार गंगाराम ( वाणी रा हात्ता ता सेनगाव जि हिंगोली) पोलिसांच्या हाती लागला. त्याने सोनपेठ तालुक्यातील वाणी संगम येथील वेअर हाऊसमधून अंदाजे ८० पोते सोयाबीन चोरून आणल्याचे सांगितले. सोयाबीन आणि पिकअप सोनपेठ पोलिसांकडे पुढील कारवाई साठी संपूर्द करण्यात करण्यात आल्याची माहिती बिट जमादार मधुकर चट्टे यांनी दिली.