सत्यशील धबडगेमानवत (जि. परभणी) : दुधना नदीपात्र काठोकाठ भरलेले, पात्रात २० ते ३० फुटांपर्यंत पाणी आणि इकडे एका महिलेस प्रसूतीकळा सुरू झाल्या... अशा परिस्थितीत महिलेला दवाखान्यात न्यायचे कसे? तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ता नाही... पाण्यातून जाण्याशिवाय पर्याय नसल्याने कुटुंबीयांनी धोका पत्करत नदीपात्रातून थर्माकोलच्या साह्याने वाट काढली. गर्भवती महिलेस थर्माकॉलवर बसवून जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागली. हा प्रकार बुधवारी सकाळी १०.३०च्या सुमारास घडला. या घटनेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही अपुऱ्या असुविधा अधोरेखित झाल्या आहेत.
गावातील रहिवासी माणिक कुटारे यांची कन्या शिवकन्या अंगद लिंबोरे गर्भवती असल्याने आठवडाभरापूर्वी माहेरी टाकळी येथे आल्या होत्या. बुधवारी सकाळी ८ वाजता तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. रस्ता बंद असल्याने प्रसूतीसाठी रुग्णालयात न्यावे कसे? असा प्रश्न कुटुंबीयांपुढे उभा राहिला. अखेर कुटुंबीयांनी आणि गावातील युवकांनी थर्माकोलचा आधार घेऊन नदी ओलांडून जायचा निर्णय घेतला. गर्भवती महिलेला थर्माकोलच्या तराफ्यावर बसवून नदी पार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. भाऊ विठ्ठल वाटोरे हे होडी चालवत होते. आणखी दोन भाऊ राहुल कुटारे आणि रमेश कुटारे पोहत पोहत तराफा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत होते, तर संगीता घटे आणि शारदा कुटारे या महिला गर्भवती महिलेला तराफ्यावर पकडून बसल्या होत्या. एक तासाच्या कठीण परिश्रमानंतर रस्त्याच्या कडेला आणण्यात यश आले. परभणीतील शासकीय रुग्णालयात दुपारी १.२० वाजता प्रसूती झाली. आई आणि बाळाची तब्येत उत्तम असल्याची माहिती गावचे सरपंच मयूर देशमुख यांनी दिली.
बहिणीला मोठ्या प्रमाणावर वेदना होत असल्याने कशाचाही विचार न करता रुग्णालय जवळ करण्यासाठी थर्माकोल तराफ्याचा वापर करून रुग्णालय गाठले. प्रवास धोकादायक होता, मात्र बहीण आणि बाळ सुखरूप असल्याने या प्रवासाचा विसर पडला आहे.
- विठ्ठल वाटुरे, भाऊ