परभणी : दुधना नदीला आलेल्या पुराच्या बॅक वॉटरमुळे शेतातील आखाड्यावर अडकलेल्या सहा जणांना ३० सप्टेंबर रोजी रेस्क्यू ऑपरेशन राबवत पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे.
परभणी तालुक्यातील सावंगी भागातून दुधना नदी वाहते. या नदीला पूर आल्याने नदीचे बॅकवॉटर एका खदानीपर्यंत पोहोचले. सावंगी शिवारातील शेतात सहा जण पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. २९ सप्टेंबर रोजीची रात्र या सहा जणांनी शेतातच काढली. ३० सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला ही माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास परभणी महानगर पालिका आणि पाथरी येथील नगर पालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी पोहोचले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही बचाव मोहीम सुरू केली. बोटीच्या सहाय्याने कर्मचाऱ्यांनी नदीच्या पलीकडील शेतशिवार गाठले. तेथून सहा जण बोटीच्या साह्याने पुराच्या पाण्यातून गावापर्यंत पोहोचले. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हे सहाही जण सुरक्षितस्थळी गावात पोहोचले. तहसीलदार डॉ. संजय बिरादार, नायब तहसीलदार गणेश चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे आदी याप्रसंगी उपस्थित होते. पुराच्या पाण्यातून बाहेर काढलेल्या सहा जणांमध्ये चार पुरुष, एक लहान मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे.
हे सहा जण अडकले होते :
विलास सोपान रवंदळे (६०), राधाकिशन रवंदळे (२६), आदित्य किशन रवंदळे (५), एकनाथ कोंडीराम रवंदळे (२६), किशन कोंडीराम रवंदळे (३१) आणि रामचंद्र लक्ष्मणराव बिलवरे (४५)