लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने १ मे पासून ‘ई-पाॅस’ मशिनवर रेशन कार्डधारक लाभार्थ्यांचा अंगठा घेण्याच्या निर्णयास स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील रेशन दुकानदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभधारकांना ३ किलो गहू व २ किलो तांदुळ असे ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मे महिन्यापासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याअंतर्गत संबधित लाभार्थ्यांसाठी एकूण ५ किलो धान्य मोफत देण्यासाठीचे नियतन जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. त्यामुळे हे धान्य वाटप लवकरच सुरू होणार आहे. अशात राज्य शासनाने ‘ई-पाॅस’ मशिनवर अंगठा घेऊन धान्य वाटप करण्याचे आदेश दिले होते. कोरोनाच्या संकटात ‘ई-पाॅस’ मशिनवर अंगठा घेण्याची जोखीम रेशन दुकानदारांना वाटत होती. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मे महिन्यापूरते ‘ई-पाॅस’ मशीन बाजूला ठेण्याचे आदेश दिले आहे. गेले ३ महिने सलग ज्या लाभार्थ्यांनी धान्य घेतले आहे, त्यांना ‘ई-पाॅस’ मशिनवर अंगठा न लावताच धान्य देण्यात येणार आहे. ज्यांनी ३ महिन्यांपूर्वी धान्य घेतले होते, त्यांची स्वतंत्र नोंद घेऊन धान्य दिले जाणार आहे.
रेशन दुकानदारांच्या मागण्या काय?
मे महिन्यापुरते शासनाने ई-पाॅस मशिनवर अंगठा न घेता धान्य वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु कोरोनाचा संसर्ग कमी होण्याची लवकर शक्यता वाटत नाही. त्यामुळे संसर्ग कमी होईपर्यंत मुदतवाढ द्यावी.
रेशन दुकानदारांना ५० लाखाची विमा सुरक्षा मंजूर करावी, प्रलंबित रिबीट वाटप करावे, पीपीई किट, मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा करावा. प्रत्येक दुकानदाराचे लसीकरण करून घ्यावे, कोरोना काळात ज्या रेशन दुकानदारांचा मृत्यू झाला त्यांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मंजूर करावे आदी रेशन दुकानदारांच्या मागण्या आहेत.
लाभार्थ्यांची भीती दूर होणार
ई-पाॅस मशिनवर अनेक लाभार्थी अंगठा लावतात. त्यातूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. आता १ महिना का होईना यातून सवलत मिळाल्याने लाभार्थ्यांची भीती दूृर होणार आहे.
रेशन दुकानावर सॅनिटायझर राहणार का ?
सध्यस्थितीत अनेक रेशन दुकानदार स्वत:च्या खिशाला झळ सोसून दुकानात सॅनिटायझर ठेवत आहेत; प्रशासनानेच सॅनिटायझरचा पुरवठा करावा, अशी या दुकानदारांची मागणी आहे.
काही रेशन दुकानदार मात्र त्यांच्या दुकानात सॅनिटायझर ठेवत नाहीत. लाभार्थ्यांनीच ते घेऊन यावे, अशा त्यांच्या सूचना आहेत.
स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुक्याध्यक्ष बाबूआप्पा साळेगांवकर यांनी प्रशासनाकडे सॅनिटायझर देण्याची मागणी केली आहे.
मे महिन्यासाठी राज्य शासनाने ‘ई-पाॅस’ मशिनवर लाभार्थ्यांचा अंगठा घेऊन नये, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व रेशन दुकानदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
-मंजूषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी