परभणी : नांदेड येथील सभेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Vaddetiwar ) यांनी गडकरींना फडणवीसांची जिरवायची होती, असे कानात सांगितल्याचे विधान एका सभेत केले होते. या विधानावर चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी, सध्या सरकारमधील मंत्र्यांचे डोके तपासून घेण्याची वेळ आली आहे, अशी झोंबणारी टीका केली आहे.
नागपूरला एकीकडे नितीन गडकरी ( Nitina Gadkari ) तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) आहेत. दोघांची तोंडे ३६ आहेत. हे नागपूरकरांना चांगले माहिती आहे. त्यामुळे गडकरींनी आपल्या कानात गुपचुपपणे सांगितले होते, फडणवीसांची जिरवायची होती. बरं झाला जिरली असा गौप्यस्फोट मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी बुधवारी एका सभेत केला होता. यावर चंद्रकांत पाटील यांनी झोंबणारी टीका केली आहे. ते म्हणाले, गडकरी हे आमचे नेते आहेत. ते असे बोलणारच नाहीत. परंतु, वडेट्टीवार यांनी कोठून हे शोधून काढले, ते त्यांनाच माहीत. सरकारमधील मंत्र्यांचे डोके तपासून घेण्याची वेळ आली आहे. सध्या ज्याला जे सुचेल ते बोलले जात आहे, असा सणसणीत टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करणारराज्यात वेगवेगळ्या भागांत अतिवृष्टीने मोठे संकट कोसळले आहे. अशा वेळी पंचनाम्याशिवाय शेतकऱ्यांना मदत देणे अपेक्षित आहे. परंतु, या सरकारमध्ये ती दानत नाही. मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली असून, १ नोव्हेंबर रोजी राज्यभरात काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदविला जाणार आहे. नोकरदारांचे पगार करण्यासाठी राज्य शासनाने कर्ज घेतले. तसेच कर्ज शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने घ्यावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. या पत्रकार परिषदेस आ. मेघना बोर्डीकर, माजी आ. विजय गव्हाणे, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, विठ्ठलराव रबदडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे, मनपातील गटनेत्या मंगलताई मुदगलकर आदींची उपस्थिती होती.