पाथरी : पाथरी-मानवत रस्त्यावर बस आणि दुचाकीची समोरासमोर अपघात होऊन होमगार्ड गंभीर जखमी झाल्याची आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. अविनाश गालफाडे असे जखमी होमगार्डचे नाव असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोखरणी फाट्याच्याजवळ तुळजाई दूध संस्थेचे संकलन केंद्र आहे. आज सकाळी 10 च्या सुमारास बीड आगाराची बस ( क्र एम एच 20 बी एल 2628 ) परभणीकडे जात होती. याच दरम्यान मानवतकडून पाथरी पोलीस ठाण्यातील होमगार्ड कर्मचारी अविनाश गालफाडे हे आपली दुचाकीवरून ( क्र एम एच 12 पी डब्लू 5844 ) पाथरीकडे येत होते. दूध संकलन केंद्राच्यासमोर बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. दुचाकी बसच्या समोरच्या चाकाखाली गेली. यात होमगार्ड गालफाडे बाजूला जाऊन फेकले गेल्याने बालंबाल बचावले. मात्र, त्यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना लागलीच पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा परभणी येथे मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस पंचनामा करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.