परभणी: सगेसोयरे संदर्भात अध्यादेश काढण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको केला. तर परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नर परिसरात आंदोलनकर्त्यांकडून तिरडी आंदोलन करण्यात आले. यावेळी सहभागी झालेल्या युवकांनी राज्य शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत तत्काळ सगेसोयरे संदर्भात अध्यादेश काढावा, अशी मागणी लावून धरली.
मागील सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यासह राज्यभरात मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी आंदोलने सुरू आहेत. मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सगेसोयरे संदर्भात अधिसूचना काढण्यात आली. मात्र या अधिसूचनेत स्पष्टता येत नसल्याने तत्काळ राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलावून सगेसोयरे संदर्भात अध्यादेश काढावा, या मागणीसाठी १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
परंतु, तरीही राज्य शासनाकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी ठीक- ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्हाभरातील प्रमुख रस्त्यांवर रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसेच परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नर, काळी कमान येथे सकाळी १० वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. त्याचबरोबर शहरातील विसावा फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारची तिरडी आंदोलन करत रास्ता रोको केला. यावेळी राज्य शासनाविरुद्ध संताप व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.