परभणी : धावत्या बसचे टायर अचानक गळून पडल्याची घटना तालुक्यातील कुंभारी-आर्वी मार्गावर १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने अनर्थ टळला.
परभणी आगारातून ग्रामीण भागासाठी खिळखिळ्या झालेल्या बसेस सोडल्या जातात. प्रवाशांनी अनेक वेळा तक्रार केल्यानंतरही महामंडळाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या बसला केव्हाही अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
सोमवारी परभणी-कुंभारी (एम एच ०६/एस ८६४७) ही बस परभणी येथून प्रवासी घेऊन निघाली. कुंभारी येथे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बस पोहोचली. बसमधील प्रवासी खाली उतरले आणि रिकामी बस घेऊन चालक-वाहक परभणीकडे निघाले. मात्र कुंभारीपासून काही अंतरावर कुंभारी-आर्वी या रस्त्यावर धावत्या बसचे टायर अचानक निखळले. त्यामुळे काही अंतरापर्यंत बस घसरत पुढे जाऊन उभी राहिली. या बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. परंतु या घटनेने परभणी आगाराचा निष्काळजीपणा समोर आला आहे.