गंगाखेड: कर्ज फेडीच्या धमक्यांना कंटाळून विषारी औषध प्राशन करून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ( दि. २ ) दुपारी सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा येथे घडली. चंद्रकांत उर्फ मुंजाजी भगवान धोंडगे ( ३० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे सुसाईड नोटचे व्हाट्सअपला स्टेट्स ठेऊन त्याने विषारी द्रव्य प्राशन करत जीवनयात्रा संपवली.
चंद्रकांत उर्फ मुंजाजी भगवान धोंडगे हा सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा येथील रहिवासी आहे. मंगळवारी दुपारी १२:२३ वाजेच्या सुमारास त्याने व्हाट्सअपला स्टेट्सवर तीन अपडेट केले. यात मी शेतात आहे, माझी उद्या सकाळी माती आहे. सर्वांनी यावे. मला पैश्यामुळे धमक्या येत आहेत, म्हणून मी आत्महत्या करत आहे. माझ्या मुलांचा सांभाळ करावा, पैश्यामुळे मला त्रास झाला असा मजकूर असलेल्या चीठ्यांचे फोटो स्टेट्सवर ठेवले. यानंतर त्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन केले.
चंद्रकांत याने व्हाट्सअप स्टेट्सवर ठेवलेल्या माहिती त्याचे चुलते हनुमान गणपतराव धोंडगे यांना मिळताच त्यांनी शेतात धाव घेतली. अत्यवस्थ चंद्रकांतला त्यांनी दुपारी १:३५ वाजता गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मुंडे यांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. त्याच्या पश्चात पत्नी, सहा वर्षीय मुलगा, दोन वर्षीय मुलगी,एक भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे. गंगाखेड पोलीस ठाण्याचे जमादार एम जी सावंत, जमादार गोविंद मुरकुटे यांनी शवविच्छेदनापूर्वी पंचनामा केला. याची कागदपत्रे सोनपेठ पोलीसांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास सुरु आहे.