गंगाखेड: अर्धांगवायूचा झटका आलेल्या बस चालकास चालकाची ड्युटी न लावता पेट्रोल पंपावर ड्युटी लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्विकारतांना गंगाखेड आगारातील वाहन परीक्षकाला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. सूर्यकांत पांडुरंग दहिफळे असे लाचखोर वाहन परीक्षकाचे नाव आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गंगाखेड आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्या ५६ वर्षीय चालकास २०१७ साली अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना चालकाची ड्युटी न देता डिझेल पंपावर ड्युटी देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ गंगाखेड आगारातील वाहन परीक्षक सूर्यकांत पांडुरंग दहिफळे ( ५३ ) याने तीन हजार रुपये प्रतिमाह प्रमाणे चार महिन्यासाठी १२ हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच देणे पसंत नसल्याने चालकाने याबाबत लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. आज दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास एसीबीच्या पथकाने गंगाखेड आगारातील वाहन परीक्षक कक्ष पेट्रोल पंप येथे सापळा लावून पडताळणी केली. दरम्यान, तक्रारदार यांना चालकाची ड्युटी न देता डिझेल पंपावर ड्युटी देण्यासाठी वाहन परीक्षक दहिफळे यांनी १२ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराकडून पहिला ५ हजार रुपयेचा हप्ता स्विकारताच वाहन परीक्षक सूर्यकांत दहिफळे यास एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. दहिफळेवर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक भरत हुंबे, पोलीस नाईक अनिल कटारे, पोलीस शिपाई माणिक चट्टे, सचिन धबडगे. चालक पोलीस नाईक जनार्दन कदम आदींच्या पथकाने केली.