गंगाखेड: शहरातील वाढती वाहतूक व अरुंद रस्त्यांबरोबरच वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने वारंवार वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. बाजारपेठेतील वाहने थांबविण्यासाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने सततच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मात्र नगरपालिका व महसूल प्रशासनाच्या वतीने ठोस पावले उचलली जात नाहीत.
शहरातील जुन्या काळातील रस्ते सध्याच्या वाढत्या लोकसंख्येनुसार अरुंद पडत आहेत. यात सराफा बाजार, दिलकश चौक, शहीद भगतसिंग चौक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक या ठिकाणी मुख्य बाजारपेठ आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची खरेदी आणि विक्रीसाठी दररोज वर्दळ असते. बाजारपेठेत दाखल झालेल्या नागरिकांना आपली वाहने थांबविण्यासाठी नगरपालिका व महसूल प्रशासनाच्या वतीने किंवा व्यापाऱ्यांच्या वतीने पार्किंगची कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहनधारक आपली वाहने रस्त्यावरच उभी करून खरेदीसाठी निघून जातात. त्यामुळे दिवसेंदिवस गंगाखेड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याकडे महसूल प्रशासन व नगरपालिकेचे ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी, शहरवासीयांमधून होत आहे.
सर्व्हे नं. २४८ मधील जागा पार्किंगसाठी पर्यायी
गंगाखेड शहरातील अदालत रस्त्यावर महसूल प्रशासनाची सर्व्हे नं. २४८ मधील ५ गुंठे जागा मोकळी आहे. महसूल प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाच्या समन्वयातून या जागेचा वापर वाहनधारकांच्या पार्किंगसाठी करण्यात येऊ शकतो. त्यामुळे शहरातील होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ही जागा पार्किंगसाठी देण्यात यावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.