मानवत : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील ५४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ६ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी निवडणूक निरीक्षक शुभांगी गौंड, संपर्क अधिकारी अरुण जऱ्हाड, तहसीलदार डी. डी. फुफाटे, नायब तहसीलदार नकुल वाघुंडे, शेख वसीम, गटविकास अधिकारी वानखेडे, गटशिक्षणाधिकारी ससाने यांची उपस्थिती होती. मानवत तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, यासाठी १२७ बुथ आहेत. यामध्ये एकूण ७१२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ७१२ उमदेवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तालुक्यातील एकूण ६ प्रभागांतील निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये सावळी व जंगमवाडी येथील ग्रामपंचायतीमधील उमेदवारांचा समावेश आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या वतीने मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण ६ जानेवारी रोजी देण्यात आले. यावेळी ईव्हीएम पथकप्रमुख मधुसूदन सोनवळकर, मास्टर ट्रेनर किशोर तुपसागर, विशाल मिटकरी, शशीकांत नेवरेकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.