परभणी : येथील बीएसएनएल कार्यालयाजवळ असलेल्या एका वीज रोहित्राने पेट घेतल्याची घटना १८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अग्नीशमन दलाने वेळेत आग विझविल्याने अनर्थ टळला.
बीएसएनएल कार्यालयाच्या समोरच असलेल्या विद्युत रोहित्राच्या खांबाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. बुधवारी या कच-याने पेट घेतला. वा-यामुळे वाढलेली ही आग रोहित्रापर्यंत पोहोचली आणि काही वेळातच रोहित्रानेही पेट घेतला. या विद्युत रोहित्राजवळच लघू व्यवसाय करणारे व्यावसायिकांची छोटी दुकानेही आहेत. आगीच माहिती तत्काळ अग्नीशमन दलास देण्यात आली. काही वेळातच अग्नीशमन दलाने घटनास्थळी येऊन आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत कोणतीही जिवित व वित्त हानी झाली नाही.