परभणी : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव, त्याची कारणे आणि आगामी काळातील रणनीतीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी सायंकाळी स्टेशन रोड भागातील एका हाॅटेलमध्ये चिंतन बैठक झाली. मात्र, यात चिंतनाऐवजी पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप करत वाभाडे काढल्याचे पुढे आले. यात पदाधिकाऱ्यांत तू-तू, मैं-मैं झाल्याने गोंधळ उडाला होता.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत कमी मतदान पडले. त्यामुळे याची कारणे काय, पक्षपातळीवर कोणत्या भागात पदाधिकाऱ्यांनी काम केले नाही, याचा आढावा घेण्यासाठी रविवारी शहरातील एका हॉटेलमध्ये चिंतन बैठक झाली. यादरम्यान, काही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला. पक्षाची महत्त्वाचे पदे असताना सुद्धा काहींनी पक्ष धोरणाविरुद्ध काम करत विरोधी उमेदवारांना फायदा होईल, अशी भूमिका घेतल्याचा आरोप केला. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांत तू-तू, मैं-मैं झाल्याचे पुढे आले. शेवटी काही जणांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.