तालुक्यातील ४३ हजार ९७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. यामध्ये कापूस हा २१ हजार ६३५ हेक्टरवर असून १५ हजार ७७३ हेक्टरवर सोयाबीन आहे, तर तूर २ हजार ७०० हेक्टरवर आहे. मूग २ हजार ३५७ हेक्टर, उडीद २८९ हेक्टर, खरीप ज्वारी १०२ हेक्टर, मका ७९ हेक्टर, बाजरी ३५ हेक्टर या पिकांचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचा पेरा ३ हजार हेक्टरने वाढला होता. ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनच्या भावात तेजी येऊन हे भाव ४ हजार ४०० पर्यंत गेले होते. भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन विक्रीला काढले. हमीदरापेक्षा जास्त दर खासगी बाजारात मिळत असल्याने शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलीच नाही. केवळ चार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. दुसरीकडे हंगामात शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील खासगी अडत व्यापाऱ्यांना ५० हजार क्विंटल सोयाबीनची विक्री केल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आपली तूर बाजारपेठेत विक्री करण्यासाठी आणायला सुरवात केली. मात्र बाजार पेठेत सुरुवातीला ५ हजार १०० ते ५ हजार २०० भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तूर विक्रीच्या बाबतीत आखडता हात घेतला. हमीदराने तूर विक्री करण्यासाठी नोंदणी करायला सुरुवात केली. एकूण १ हजार ५६० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. केंद्रावर तुरीचा काटा हालेल असे वाटत होत. मात्र जानेवारी मध्ये तुरीच्या भावात तेजी येऊन हा भाव सहा हजारांवर गेले. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना तूर विकून मोकळे झाले. सद्य:स्थितीत ६ हजार ५०० पर्यंत चांगल्या तुरीला भाव मिळत आहे. यामुळे या हंगामात हमीभाव केंद्रावर शुकशुकाट दिसून आला.
खासगी व्यापाऱ्यांना पसंती
हमीदरा पेक्षा जास्त भाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी २३ फेब्रुवारीपर्यंत ५० हजार क्विंटल सोयाबीनची विक्री केल्याची नोंद झाली आहे, तर १० हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना विक्री केल्याची नोंदणी बाजार समितीकडे झाली आहे.