परभणी : मुलीच्या लग्नासाठी पै पै करून जमा केलेले दोन लाख १४ हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १६ मार्चच्या मध्यरात्री जिंतूर तालुक्यातील कवडा येथे घडली असून या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कवडा येथील शेतकरी गणेश धुळाजी काळे यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी गेल्या १० वर्षांपासून २ लाख १४ हजार रुपये जमा करून घरातील वरच्या मजल्यावरील एका खाेलीमध्ये स्टीलच्या डब्यात ठेवले होते. त्यांचा मुलगा भारत काळे हा जालना येथे पोस्टल असिस्टंट म्हणून नोकरीस आहे. ते मुलाकडे जात-येत असत. १६ मार्च रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास ते जालना येथून परत आले. त्यानंतर घरी झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता त्यांनी घराची उठून पाहणी केली असता वरच्या मजल्यावरील खोलीच्या दरवाजाची एक कडी तुटल्याचे त्यांना दिसले व त्या कडीला दोरी बांधल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे गणेश काळे यांनी तातडीने वरच्या रूममध्ये जाऊन स्टीलच्या डब्यात ठेवलेल्या पैशांची पाहणी केली असता त्यामध्ये २ लाख १४ हजार रुपयांची ऱक्कम दिसून आली नाही. याबाबत त्यांनी बामणी पोलीस ठाण्यात १७ मार्च रोजी फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.