परभणी : जुन्या सामाईक जागेच्या वादातून दोघांनी एका सोळा वर्षीय मुलास जीवे मारले होते. या प्रकरणात परभणी जिल्हा प्रमुख सत्र न्यायालयाने दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोबतच दहा हजार रुपये प्रत्येकी दंड लावला आहे. सदरील दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. हा निकाल गुरुवारी न्यायालयाने दिला.
फिर्यादी यांच्या परिवाराचा व तिचा भाया यांच्या जुन्या सामाईक जागेच्या वादातून फिर्यादीच्या सोळा वर्षीय मुलास दोघांनी जीवे मारल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये १३ फेब्रुवारी २०२२ मध्ये नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.जी.सांगळे यांनी केला. आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. गुरुवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांनी या खून प्रकरणात दीपेश उर्फ दीपक माणिकराव मिरासे (२४, रा.रामेश्वर प्लॉट, परभणी) व भीमराव उर्फ नितीन नंदकिशोर नेमाने (२१, रा.गणेश पार्क, वैद्यनाथ शाळेजवळ, परळी) या दोघांना जन्मठेप व सोबतच दहा हजार रुपये प्रत्येकी दंड अशी शिक्षा सुनावली.
हा दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षाही सुनावली आहे. या खटल्यात पोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा खटला कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, अंमलदार दत्ता खुणे यांनी काम पाहिले. सरकारी अभियोक्ता म्हणून ज्ञानोबा दराडे यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली.
'तिला' शिक्षण तर 'त्याला' संसार महत्वाचा होता; संतापलेल्या पतीने शाळेत जाणाऱ्या पत्नीला संपवले