परभणी : पालम येथे घातक शस्त्रासह दराडा टाकून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व नगदी असा सुमारे ४० लाखांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपींना परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी बुधवारी पुणे येथील हडपसरमधून ताब्यात घेतले. या आरोपींना पालम ठाण्यात हजर करण्यात आले.
पालम येथे सिद्धनाथ ज्वेलर्स या दुकानावर ४ फेब्रुवारीला घातक शस्त्रासह दरोडा टाकून चोरट्यांनी फिर्यादी व साक्षीदारास मारहाण करीत दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी असा एकूण ४० लाखांचा ऐवज चोरून नेला होता. पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हा शाखा पथक आरोपींचा शोध घेत होते. मंगळवारी अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हडपसर पुणे येथून नागेश पोचीराम गायकवाड व शिवराज जयराम कंधारे (दोघे रा. शिवनगर नांदेड) यांना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. तपास कामी पालम पोलिसांकडे सुपूर्द केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, सपोनि पी.डी. भारती, पोलीस कर्मचारी विलास सातपुते, गायकवाड, ढवळे, पौळ यांनी केली.