परभणी : नवा मोंढा ठाण्याच्या हद्दीत ऑटोरिक्षामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील ३४ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतलेल्या प्रकरणात ऑटोचालक व अन्य दोन जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. परभणी पोलिसांच्या पथकाने या प्रकरणात दोन चोरट्यांना नांदेड येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला ऑटो व चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धर्मापुरी येथील रामेश्वर जिजाजी चट्टे यांनी २६ एप्रिलला झालेल्या या घटनेची नोंद नवा मोंढा ठाण्यात केली होती. या घटनेमध्ये पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी सोमवारी गुन्ह्याच्या तपासासाठी चार पथक स्थापन केले. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पथक व सायबर विभागाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे परभणी शहर, झिरो फाटा, पूर्णा येथे शोध घेतला. मिळालेल्या माहितीवरून सदरील गुन्हा हा नांदेड येथील गौस बेग रफिक बेग, शेख वसीम शेख सत्तार व इतर दोन जणांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी गौस बेग रफिक बेग (२२, ऑटोचालक, रा.मस्जिद जवळ, निजाम कॉलनी, श्रीनगर, नांदेड) व त्याचा मित्र शेख वसीम शेख सत्तार (२७, रा.नई आबादी, नांदेड) या दोघांना मंगळवारी नांदेड येथून ताब्यात घेतले. त्यांनी सदरचा गुन्हा अन्य दोन मित्रांसोबत केल्याचे सांगितले.
५७ हजारांचा मुद्देमाल जप्तपोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण ५७ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंडे करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, मारोती चव्हाण, नागनाथ तुकडे, व्यंकट कुसुमे, बाळासाहेब तूपसमुद्रे, हरिश्चंद्र खूपसे, दिलावर खान सायबरचे बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांनी केली.
ऑटोत बसताच लुटले धर्मापुरी येथील रामेश्वर जिजाजी चट्टे यांनी फिर्याद दिली. रामेश्वर चट्टे हे परभणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २६ एप्रिलला सकाळी आले होते. मुलीचे लग्न असल्याने त्यांनी तीस हजार रुपये घरून परभणीत आणले होते. त्यांनी बँकेतून चार हजार सातशे रुपये काढले. यानंतर शिवाजी महाराज पुतळा येथून बसस्थानक जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी ऑटो पकडला. या ऑटोमध्ये मागील बाजूस बसलेल्या दोन अनोळखी प्रवाशांनी त्यांच्या खिशातील ३४ हजार ७०० रुपये बळजबरीने काढून घेतले.