पाथरी : बेकायदेशीर रित्या आणि विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल ( Two in arrested with pistol) आणि ५ जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी पाथरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शहरातील आष्टी फाटा परिसरात करण्यात आली आहे. गणेश छत्रभुज खुडे आणि प्रताप बाजीराव इंगळे ( रा बोरगव्हान ता पाथरी ) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पथक १३ ऑक्टोबर रोजी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पाथरी येथे आले होते. दरम्यान, रात्री ८ वाजेच्या सुमारास या पथकाला आष्टी फाटा टी-पॉईंट जवळ दोघेजण देशी पिस्टल बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून पाथरी येथील पोलीस उपनिरीक्षक जी. एन. कराड आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने आष्टी फाटा टी पॉईंट येथे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास धाड टाकली.
यावेळी गणेश छत्रभुज खुडे आणि प्रताप बाजीराव इंगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्टल आणि ५ जिवंत काडतूस आढळून आले. ४० हजार रुपये किंमतीचे पिस्टलची आणि २ हजार ५०० किंमतीचे काडतुस असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी किशोर सुरेश चव्हाण यांच्या फिर्यदिवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. बंदखडके करत आहेत.